धोडीया आदिवासी, Dhodia Adivashi, Dhodia Trible, Dhodi Dhodia
धोडीया आदिवासी
तोंड ओळख : भारत, महाराष्ट्र ४५ जनजाती (ST) आदिवासी समाजामध्ये धोडीया (धोडी) जमात प्रामुख्याने गुजरात राज्यात उंबरगांव तालुका व धरमपूर, चिखली, वलसाड, सुरत, नवसारी, व्यारा, डांग हे जिल्हे आणि तसेच दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेश व महाराष्ट्रातील पालघर जिल्हा (पूर्वीचा ठाणे जिल्हा) तसेच ठाणे आणि (बृहन मुंबई) ह्या ठिकाणी धोडीया जमातीचे वास्तव्य हे पूर्वीच्या काळापासून बहुसंख्येने आहे.
धोडीया जमातीच्या संशोधनाच्या दंत कथे नुसार कोणी म्हणतात, महाराष्ट्रातील धुळे जिल्हा कोणी म्हणतात, सौराष्ट्र येथील धंदकुआ कोणी म्हणतात, ओडीसा राज्यातून स्थलांतर होऊन आलेले आहे, अशी दंतकथा सांगते, परंतु वरील ठिकाणी राहणारे हे सर्व धोडीया आदिवासी स्थलांतरीत नाही. १९५६ च्या भारतीय आदिवासी जनगणनेनुसार तसेच गुजरात राज्याच्या जनजाती नोंदणी नुसार धोडीया(धोडी) असे क्रमांक ९ वर नोंद आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात धोडीया जमातीचे क्रमांक १५ वर नोंद आहे. परंतु दोन्ही राज्यामध्ये धोडी आणि धोडीया ही एकच जमात आहे. ती जमात कोठूनही स्थलांतरीत झालेली नाही. तरी दंत कथेच्या संशोधनानुसार त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. धोडीया आदिवासी स्थलांतरीत झालेले नाहीत याचे अनेक पुरावे आहेत.युनोच्या(जागतिक संघटना) भारतातील आदिवासी जमातीवर झालेल्या संशोधना नुसार युनोच्या व्याख्या क्र.१ नुसार जगाच्या कोणत्याही भागातून दुसरा मानव समूह जो कोणत्याही देश, विभाग,प्रदेश किवा क्षेत्रामध्ये पोहोचण्याच्या पूर्वी वस्तीकरून राहणारा जो जनसमूह तो आदिवासी म्हणून धोडीया/ धोडी ही जमात आदिवासीच आहे.
महाराष्ट्र, गुजरात मध्ये राहणाऱ्या अनादि काळापासून इतर जनजाती (S.T.) यांचे दैवत, चालीरीती, पेहराव, कला, संस्कृती आणि व्यवसाय जवळ जवळ सारखेच आहेत. आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. म्हणून धोडीया हा इतर जमाती प्रमाणे निसर्ग पूजक आहे. दैवतामध्ये उदा. बरम (भरम, बनभो) देव, हिरवादेव ,नारणदेव, वाघोबा, चेडा, धनतेरी(भूमी), कनसेरी, सूर्य, चंद्र इत्यादी धोडीया जमातीचे दैवत हेच आहे. जर इतर जमाती स्थलांतरीत नाही म्हणून धोडीया सुद्धा स्थलांतरीत नाही. बॉम्बे (मुंबई) प्रांत पूर्वी महाराष्ट्र गुजरात व सौराष्ट्र ह्या समुहाचा होता. भारत स्वातंत्र्या पूर्वी आणि स्वातंत्र्या नंतर सुद्धा ह्याच विभागात राहत होते. १ मे १९६० ला दोन्ही राज्यांचे ( उदा. महाराष्ट्र व गुजरात) राज्याच्या हद्दीचे विभाजन झाले, परंतु येथे अनादी काळापासून वास्तव्य करून असलेले आदिवासी जमाती यांचे विभाजन झालेले नाही. म्हणून या जमाती वरील तीन पुराव्या नुसार धोडीया किवा धोडी आदिवासी आप आपआपल्या राज्यामध्ये स्थलांतरीत नाही.
भाषा : धोडीयांची मातृभाषा ही धोडीया बोली आहे. (गुजराथी नाही)
कुळे : धोडीया जमातीत अंतर्विवाह संबंधामुळे निर्माण झालेला गट म्हणता येणार नाही. धोडीया जमातीमध्ये निरनिराळ्या व्यवसायामुळे त्यांची नावे ठेवण्यांत आलेली आहेत. त्याला गट नाही. पण कुळ म्हणतात. धोडीया जमातीत एकाच कुलामध्ये मुलगी दिली जात नाही. म्हणजे बेटी व्यवहार होत नाही. धोडीया जमातीत अंदाजे २७५ च्यावर अशी कुळे आहेत. ती पुढीलप्रमाणे परंतु कुठल्याही संकरामधून निर्माण झालेली ही धोडीया जमात नाही. सुवांगीया, चोबाडीया, धनुधर्मी, गरासिया, देसाई,रुपासरी,रणमोलीया, मोटानाईक, गायकवाड अशी अनेक कुळे आहेत. म्हणून कुळ कायदा हा आदिवासीच्या जमिनी हक्का करिता प्रचलित आहे. तसेच धोडीया ही जमाती हिंदू मध्ये मोडत नसल्याने कुटुंब प्रमुख पुरुष नसून स्त्री ही कुटूंब प्रमुख असते. म्हणून याला मातृत्व कुटूंब पद्धती असे म्हणतात.कुटूंबाचा सगळ्या प्रकारचा व्यवहार हा स्त्रीच्या हाती असतो. धोडीया समाजामध्ये वरच्या जमातीच्या लोकांना आपल्या समाजात प्रवेश देत नाही.
घरे व वस्ती : धोडीयांची घरे जास्तीत जास्त स्वतःच्या जमिनीवर बाधून वास्तव्यास असतात. धोडीयांचा जास्त मोठा समूह असल्यास त्यांच्या प्रत्येकाच्या शेतीवर घर झोपडी बनवून व स्वत:हून लहान लहान रस्त्याने ती जोडलेली असतात. त्यांना पाडे असे म्हणतात. झोपडीच्या भिंती कारवी, बांबू , खाजरीच्या झाडाची पाने किंवा बोरुची असून त्या आतून बाहेरून शेणा मातीने सारविलेल्या असतात. घराची छपरे सागाची सुकीपाने किवा पळसाची सुकीपाने तसेच माडाची झावळी इत्यादी वापरून त्याच्यावर सूकेगवत किवा भाताची पावली (पेंढा) ने साकारलेली असतात परंतु फरशीची घरे नसतात.झोपडीच्या मागील बाजूस स्वयंपाक घर तसेच माजघरात आतमध्ये एक उखळ असतो. ज्यावर भात, कडधान्य,कांडणे वैगेरे केले जाते. तसेच इतर पारंपारिक व्यवहार जसे लग्नकार्य असल्यास हळद ही उखळ बसऊन लावली जाते. घराच्या उत्तर किवा दक्षिण दिशेस गाय किवा बैल बांधण्या करिता व्यवस्था केलेली असते. त्याला बैलायो गोठो असे म्हणतात.झोपडीच्या मधल्या भागात परहाळ असे म्हणतात. झोपडीचा पुढील भाग आलेल्या पाहुण्यांना बसण्यासाठी खुला मोकळा ठेवलेला असतो. त्याला (ओटा) असे म्हणतात. झोपडीच्या बाहेर अंघोळीसाठी व्यवस्था केलेली असते त्याला धोडीया भाषेत (वाडगुळी) असे म्हणतात.ती खाजरीच्या पानाने चारही बाजू बंदकरून एक छोटासा दरवाजा वजा आडोशासाठी कपडा बांधलेला असतो, अंघोळीला बसण्यासाठी एक मोठा चपटा दगड ठेवलेला असतो.
घराच्या मध्यभागात धान्य साठविण्यासाठी कणगी (ज्याला धोडीया भाषेत पाळूडा म्हणतात ) तसेच धान्य दळण्यासाठी जाते ( दोन गोलाकार चपट्या दगडाचे) असते. त्याला धोडीया भाषेत (घटी) असे म्हणतात. तसेच माजघरात एका कोपऱ्यात धोडीयांचे कुळ दैवत बसविलेले असते जसे कंसेरी, हिरवा देव, नारण देव वैगेरे.
व्यवसाय :-शेती आणि शेत मजुरी हे धोडीयांचे मुख्य व्यवसाय तसेच जोड धंदा म्हणून पशू पालन हाही एक वंशपरंपरागत व्यवसाय आहे. तसेच धोडीया आता शिक्षित झाल्याने नोकरी व्यवसाया निमित्ताने बाहेर जावे लागत असल्याने तिथल्या प्रथा व वंश परंपराचे धोडीया संस्कृतीवर बदलाचे परिणाम आहेत.
आहार:- धोडीया मांसाहारी आहेत. गोमांस सोडून जे इतर सर्व प्रकारची मांस खातात. दैनंदिन आहारात तांदूळ पेजवा (भात), उडीदाची डाळ, वालाची डाळ असे वापरतात किवा तांदळाची, नागलीची भाकर कधी कधी चवळी,वाल, तूर, भोपळा, दुधी व अळूच्या भाज्या खातात. सकाळी चहा किवा तांदळाच्या पेजेची न्याहरी करतात. धोडीया स्त्री पुरुष दोघांनाही दारू प्यायला आवडते.तसेच वयस्कर स्त्री पुरुष ह्यांना आपट्याच्या पानांची विडी ओढायला आवडते. प्रसंगी सण समारंभावेळी म्हणजे दिवाहो (दिवासा) होळी, दिवाळीच्या वेळेस चवळी, कोंबडीची भाजी तसेच पतवाडे, ढेकळे, रवा, हावेला हे पदार्थ आवडीने केले जातात.
पोशाख व दागिने :- धोडीया जमातीतील स्त्रीया लुगडे व चोळी नेसतात लहान मुली फ्रॉक घालतात. तसेच वयात आलेल्या मुली घागरा घालतात स्त्रीया केसांच्या मधोमध भांग पडून मागील बाजूस शेंडा (बुचडा) घालतात. पुरुष धोतर, कुडता घालतात व उत्सवा प्रसंगी पागोटे घालतात तरूण पुरुष टोप्या घालतात. स्त्रीया सोने, चांदी, पितळ व तांब्याचे दागिने घालतात. नाकात फुली, पायांत बोटात जोडवी, गळ्यात चांदीचा, गाठलो बोरमाळा घालतात. हातात बांगड्या दंडात घोट्यात वळे इ. प्रकारचे दागिने तसेच पायात डोडला घालतात. काही पुरुष कंबरेला काळा दोरा, चांदीची साखळी व हाता बोटात अंगठी घालतात. धोडीया जमातीत सर्रास गोदण्याची प्रथा नाही. मात्र काही मुली लग्नापूर्वी कपाळावर एक ठिपका गोंदऊन घेतात. तर मुले हातावर त्यांची नावे अथवा देवी देवतांची चित्रे गोंदवून घेतात. गोंदवून घेण्यामागे कोणतीही पारंपारिक समजूत नसते.
सण व उत्सव :-धोडीया जमातीचे लोक सर्वात मोठा आणि सर्व प्रथम पावसाळ्यात येणारा सण म्हणजे दिवाहो (दिवासा) असे म्हणतात. हा सण खास करून लहान मुली ते लग्न झालेल्या मुलींचा सण आहे. या सणाची मान्यता अशी आहे कि, आपला जोडीदार हा सात समुंदरापार अदृश्य असतो तो आपल्या भावी संसारासाठी व पुढील जीवन जगण्यासाठी चांगला भेटावा, मिळावा या उद्देशाने कुमारीका मुली ढिंगला ढिंगली म्हणजेच (नवरा नवरी ) ह्या कापडाच्या चिंध्यां पासून बनवून ते अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यांचे डोळे हे एक विशिष्ट वनस्पतीची जी उन्हाळ्यात होते तिला जुंगीचावेल म्हणतात त्याच्या बियापासून बनवितात नंतर त्यांना उत्सवाच्या दिवसाच्या चार ते पाच दिवस आगोदर हळद लावून उत्सव सणाच्या दिवशी त्यासाठी लाकडाचा तराफा होडी बनवून गावातील प्रत्येक कुमारीका तसेच लग्न झालेल्या मुली त्या ढिंगला ढिंगलीसाठी गोड पदार्थ बनवून (ढेकळा, हावेला, रवा ) बनविलेल्या बाहुल्याबरोबर तराफामध्ये ठेवतात आणि पारंपरिक गाणी गाऊन तसेच तूर थाळी हे वाद्य वाजवून त्याची मिरवणूक काढून मुली त्या तराफ्याचे नदीवर जाऊन विसर्जन करतात.
पारंपारिक जमात पंचायत-
धोडीयांची स्वतःची परंपरागत जमात पंचायत आहे. जमातीतील भांडणाचा निवाडा, या जमात पंचायतीत करण्यात येतो. पंच मंडळींना पटेल किंवा कारभारी म्हणतात आणि त्यांच्या प्रमुखास मुखिया. हि पदे वंशपरंपरागत नसून जोपर्यंत जमातीतील सदस्यांचा विश्वास आहे, तो पर्यंत त्यांना हि पदे भूषविता येतात. कोणताही वाद विवाद तडजोड करून मिटविण्यावर पंचायतीचा भर असतो. तड जोडीचे प्रयत्न निष्फळ झाल्यास पंचायत बसविली जाते. ज्यात दोन्ही पक्षांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि आरोप सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीस दंड केला जातो. गुन्ह्याच्या स्वरूपावरून दंडाची रक्कम ठरविली जाते. हि रक्कम निर्दोष व्यक्तीस दिली जाते किंवा त्यातून दारू आणली जाते किंवा जमात जेवण घातले जाते. मुला-मुलींत विवाह पूर्व शारीरिक संबंध आल्यास पंचायत दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्यास सांगते.
धर्म :धोडीया हे निसर्ग पूजक आहेत आणि ते हिंदू धर्मात मोडत नाही त्यामुळे हिंदू धर्माचे जे काही कायदे आहेत ते त्यांना लागू होत नाही. उदा. रेव्हेन्यू आणि मॅरेज ऎक्ट लागू होत नाही. धोडीया आदिवासी दैवत उदा. बरमदेव, हिरवादेव, वाघ्या (वाघोबा) , नारनदेव, सूर्य, चंद्र, कंसेरी, धनतेरी,धोडीया जमातीचे लोक आपल्या दैवतांना बोकड, कोंबडी, नारळ तुपाचा दिवा यांचा नैवद्य दाखवतात आणि मातीची लहानशी घुमटी किंवा देवळी बांधून त्यावर लाल किंवा पांढऱ्या रंगाची निशाणी लावतात मातीच्या छोटयाशा पुमतीवरील तीन किंवा चार मातीचे घोडे म्हणजे बरमदेव होय आणि शेंदूर लावलेली सुपारी म्हणजे हिरवा देव होय घराच्या प्रागंणात शेंदूर लाऊन प्रस्थापित केलेला दगड किंवा मनुष्याकृती कोरलेला लाकडाचा तुकडा म्हणजे खत्री होय. हा त्यांचा पूर्वज देव असतो गावाच्या वेशीवर लाकडात कोरलेला वाघ शेंदूर फासून ठेवलेला असतो. हा वाघ्या किंवा वाघदेव या दैवतांची पूजा सहसा दिवाळी, होळी लग्न प्रसंग आणि साथी चे रोग पसरल्यास केली जाते . धोडीया जमातीमध्ये भगताला फार मान असतो.भगत मंत्र तंत्र, जादूटोणा व जडीबुटीची औषधे या विषयांत तज्ञ असतो. धोडीया भूतांना(खत्र्यांना)दारूचा नैवद्य दाखवतात.आपल्या रूढी, परंपरा चालीरीती व इतर विधी ( लग्न आणि मृत्यू ) ह्या विधी पार पाडण्यासाठी धोडीया जमातीत ब्राम्हणांना बोलवत नाही.
तूर – थाली
हे वाद्य धोडीया जमातीचे महत्वाचे वादये आहे. हे वाद्य खास करून विशिष्ट प्रकारची माती वापरून जसे मटके भाजतात त्या प्रमाणे माती भाजून बनविले जाते. हे वाद्य लांबट गोल एका बाजूला मोठे आणि एका बाजूला लहान आकार असतो त्याला काठा असे म्हणतात. ते आतून दोन्ही बाजूने पोकळ असते. त्याच्या दोन्ही बाजूला म्हैस या प्राण्याचे चामडे दोन्ही बाजूला चढविले जाते. दोन्ही बाजूचे चामडे (पड) एकमेकांना(स्थिर तंग ) राण्यासाठी म्हशीचेच चमडयाचे लहान दोरी (वादी) बनवून दोन्ही बाजूला पडाच्या चमडयामध्ये छिद्र पाडून त्यात टाकून खेचले जाते. म्हशीचे चामडेच का वापरतात कारण ते मऊ आणि टिकाऊ असते आणि ते लवकर फाटत नाही. जेव्हा तूर वाजवण्याच्या वेळेस भेण (लेप) दोन्ही बाजूच्या चामडयावर मधोमध लावला जातो. हे भेण म्हणजे शिजवलेला भात व राख मिसळून केला जातो. जेव्हा वाजवण्याच्या वेळेस दोन्ही बाजूला भेण थोडासा ओला करून चमडयावर लावला जातो. तेव्हा चमडयाला ते भेण घट्ट चिकटते त्यामुळे जेव्हा तुरीया (तुरवाला) तूर वाजवितो तेव्हा चमडयावर भेण चिकटल्याने एक कंपन ध्वनी तयार होतो. आतून आतून तूर पोकळ असल्याने त्याच्या आवाज लांब दूरवर पर्यंत ऐकू येतो.
तूर हे धोडीया आदिवासीचे विशिष्ट प्रकारचे वाद्य आहे. ते फक्त गळ्यात अडकवून व दोन्ही बाजूला कपड्याचा पट्टा किंवा टावेल बांधून तूर वाजविले जाते. ज्या वेळी तूर वाजते तेव्हा तूर वाजवणाऱ्याला चांगला आधार मिळतो व तूर जोशात वाजविले जाते. तुरा सोबत ताल घेण्यासाठी कहाई थाळी (परात) सोबत वाजविली जाते. या तुराचे विशिष्ट असे बावीस ते पंचवीस चाळे आहेत चाळे म्हणजे वाजविण्याच्या निरनिराळ्या पद्धती आणि प्रत्येक चाळयावर गीते (लोरीया) आहेत. तूर केव्हाही वाजविले जाते. शुभ-अशुभ, दिवस-रात्री हे तुरच असे वाद्य आहे कि जे असे फक्त गळ्यात आडकवून वाजविले जाते हे धोडीया आदिवासीचे वाद्य आहे. त्यात सर्वात मोठा आवाज तूर आणि थाळीचा असतो.
Comments
Post a Comment