आदिवासी दिवस व आदिवासी अधिकारांचा घटनाक्रम, विश्व आदिवासी दिवसाच्या पुर्वसंध्येस सर्व आदिवासी बांधवांना बारा कलमी संबोधन....
विश्व आदिवासी दिवसाच्या पुर्वसंध्येस सर्व आदिवासी बांधवांना बारा कलमी संबोधन
आदिवासी दिवस व आदिवासी अधिकारांचा घटनाक्रम
सर्वांना जोहार,
प्रथमतः सर्वांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रिय बंधुभगीनींनो, युरोप व युरेशियातून वसाहतवादाला सुरुवात झाली. यामध्ये संपूर्ण जगातील आदिवासी समुदायाच्या संदर्भात पुढील घटनाक्रम मांडता येईल.
1) इसवीसन 1300 पर्यंत जगातील आदिवासी मोठ्या प्रमाणावर स्वशासन व्यवस्था, संस्कृति आणि स्वातंत्र्याचे जीवन जगत होता.
2) इसवीसन पूर्व 5000 वर्षांपुर्वी आर्य आक्रमण भारतात झाले. आदिवासी जंगलात लोटले जाऊन तेथे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून राहिले. इसवीसनाच्या 7 व्या शतकानंतर इस्लामी आक्रमण आफ्रिकेत सुरू झाले. इसवीसन 1492 मध्ये युरोपियन आक्रमक कोलंबसने अमेरिकेत पाऊल ठेवले व पुढील काही दशकात अमेरिकेतील 2 करोड पेक्षा जास्त आदिवासींची बंदुकीच्या जोरावर कत्तल करून तेथील रेड इन्डियन आदिवासींना गुलाम बनवले. त्यांना मानव म्हणून नाकारले आणि मानवापेक्षा खालच्या दर्जाचे - जंगली म्हणून त्यांची गणना केली. भारतात सुद्धा राक्षस, वानर (वन-नर) इ. शब्द वापरले गेले.
3) याच तेरा व चौदाव्या शतकाच्या सुमारास भारतात दिल्लीत मुघल सत्ता स्थिर होऊन वाढू लागली. दक्षिण व मध्य भारतातील साम्राज्यवादी सत्ता साम्राज्य विस्तारामुळे आदिवासींच्या संपर्कात येऊ लागल्या. त्यांचे अनुकरण करीत आदिवासी राज्य सुद्धा निर्माण झाली.
4)17 व्या शतकाच्या शेवटी आस्ट्रेलियात गोऱ्या वसाहतवाद्यांचे आक्रमण होऊन अॅबोरिजनल आदिवासींची प्रचंड कत्तल झाली व उर्वरित आदिवासींना गुलाम बनवले गेले. याच शतकात आफ्रिका खंड सुद्धा युरोपीय आक्रमकांनी व्यापला. याच सुमारास भारतात इंग्रजांनी स्थानिक भारतीय सत्तांचा पुर्ण पाडाव करून एकछत्री ब्रिटिश सत्ता स्थापन केली.
5)ब्रिटिशांनी आदिवासी भागात जमीन महसूल गोळा करण्यासाठी अठराव्या शतकात गैर आदिवासी जमीदार नेमले ज्यांनी आदिवासींना त्यांच्याच जमीनीवर गुलाम म्हणून राबवले.
6)अमेरीकेत सन 1500 पासून आदिवासींना फक्त जिवंत राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. तर भारत व आस्ट्रेलियात 17 व्या शतकापासून फक्त जिवंत कसे राहता येईल यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागला. 300 - 500 वर्षाचा हा काळ आदिवासी इतिहासातील सर्वात खडतर, रक्तरंजित काळ होता.
7) 24 आॅक्टोबर 1945 साली संयुक्त राष्ट्र संघाची (UNO) स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र संघाने शांतता आणि मानवी हक्क, जगण्याचा अधिकार याविषयी चर्चा करण्यास सुरुवात केली. या काळापर्यंत फक्त गोरा युरोपियन किंवा भारतातील उच्च वर्णिय हेच स्वतःला पुर्ण माणूस मानत व मानव म्हणून हक्क मिळत. आदिवासी, काळ्या वर्णाचे आफ्रिकन यांना Sub-human म्हणजे मानवापेक्षा खालच्या दर्जाचे (ताब्यात असतील ते गुलाम आणि डोंगरात लपून आपल्या अस्तित्वासाठी लढणारे जंगली/Savages) मानले जाई आणि त्यांना फक्त गुलाम म्हणून वागणूक मिळे. संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्मिती नंतर या दबलेल्या आदिवासींना आपले म्हणणे मांडण्यासाठी एक नवे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आणि जगभरातून खासकरून अमेरिकन रेड इन्डियन आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू करून UNO ला वारंवार अर्ज, विनंत्या, लेखी निवेदनाद्वारे आदिवासींना सुद्धा पुर्ण मानवाचा दर्जा देउन मुलवासी म्हणून मानवी अधिकार देण्याची मागणी जोर धरू लागली.
8)1945 - 1982 या सुमारे चाळीस वर्षे वारंवार आंदोलन, निवेदने देऊनही आदिवासींचा मानव म्हणून विचार केला गेला नाही. या काळात जगभरातील आदिवासी चळवळीत "आम्ही माणूस आहे जनावर नाही." ही घोषणा महत्वाची होती. असे असले तरी संयुक्त राष्ट्र संघ हा सुद्धा गोऱ्या युरोपियन आणि उच्च वर्णियांच्या प्रभावाखाली होता आणि त्यांच्यालेखी यावेळेपर्यंत सुद्धा आदिवासी हा मानवापेक्षा कमी दर्जाचा आहे या पुर्वग्रहाच्या छायेखालीच असल्यासारखा आदिवासींकडे दुर्लक्ष करून होता.
9)शेवटी 9 आॅगस्ट 1982 साली संयुक्त राष्ट्र संघाने पहिल्यांदा आदिवासी लोकांचा विषय पटलावर चर्चेसाठी घेतला. संयुक्त राष्ट्र संघात 9 आॅगस्ट 1982 ते 1992 अशी जवळपास दहा वर्षे आदिवासींना मानवी अधिकार देण्याबाबत चर्चा झाली. जगातील कोणत्याही डिबेट - चर्चेपेक्षा 'आदिवासींना मानवी अधिकार कसे द्यावेत' या विषयावर चाललेली ही चर्चा सर्वात जास्त लांबीची होती. शेवटी आदिवासींना सर्व राष्ट्रात पुर्ण मानवी दर्जा देऊन त्यांना मानवी अधिकार देण्याचे निश्चित होऊन जगभरात जनजागृती व्हावी म्हणून 9 आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस - International Day Of World's Indigenous Peoples म्हणून घोषित करण्यात आला. आदिवासींनी अनेक शतकांच्या मानवी दर्जा साठी केलेल्या लढाईचा पहिला टप्पा पार केला. परंतु अजूनही जगातील देश आदिवासी अस्तित्व मानायला तयार नव्हते. भारताने सुद्धा देशात आदिवासी नसल्याचा दावा केला.
10) पहिली 1492 - 1945 अशी सुमारे 300 - 500 वर्ष निव्वळ जिवंत राहण्यासाठी मरणप्राय संघर्ष, नरसंहार, सांस्कृतिक संहार, गुलामी अशा प्रचंड यातना आदिवासी समुदायांनी भोगली. त्यानंतरची 1945 - 1982 अशी सुमारे 40 वर्षे संयुक्त राष्ट्र संघात मानव म्हणून ओळख मिळवून आम्ही आदिवासी - मुलवासी आहोत हे मान्य करवून घेण्यासाठी UNO मध्ये संघर्ष. यानंतर सुरू झाला संघर्षाची तिसरी फेरी 1992 - 2004.आदिवासी - मुलवासी सिद्ध झाल्याने मुलवासी - Indigenous - आदिवासी म्हणून जल, जंगल, जमीन, स्वशासन, स्वनिर्णयाचा अधिकार मिळवण्यासाठी पुन्हा पुढची दहा वर्षे (1992 - 2004) आदिवासी समुदायांनी संघर्ष करून 13 सप्टेंबर 2004 साली शेवटी "आदिवासी अधिकारांचे घोषणापत्र - United Nations Declaration On Rights Of World's Indigenous Peoples (UNDRIP) घोषित करून आदिवासींना जल, जंगल, जमीन, स्वशासन, स्वनिर्णयाचा अधिकार देण्याबाबत जगभरातील देशांना संयुक्त राष्ट्र संघाने आग्रह केला. म्हणून 13 सप्टेंबर हा जागतिक आदिवासी अधिकार दिवस म्हणून मानण्यात येतो. यासाठी 1950 पासून आजपर्यंत आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी दोनदा महासचिव अशोकभाई चौधरीजी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत जाऊन भारतीय आदिवासींचा आवाज म्हणून 'भारतातील आदिवासी हे Indigenous Peoples आहेत त्यांना UNDRIP चे अधिकार मिळायलाच पाहिजेत " अशी जोरदार आणि स्पष्ट भुमिका मांडली आहे. याशिवाय आदिवासी समन्वय भारत चे उराँव आदिवासी सदस्य बेंजामिन बारा जागतिक आदिवासी भाषा वर्षानिमित्त 2019 साली UNO मध्ये आदिवासींचा आवाज बनले आहेत.
11) आज संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी अधिकारांचे घोषणापत्र जाहीर केले असले तरी भारतासारख्या अनेक देशांनी आजही आदिवासींचे अस्तित्व व ओळख नाकारली आहे त्यामुळे आदिवासी समुदाय आजही आपल्या हक्कांपासून वंचित राहिला आहे.
12)आपल्या पुर्वजांनी आणि वाडवडिलांनी सुमारे 600 वर्षे उपाशी, अर्धनग्न अवस्थेत, गुलामीच्या हाल अपेष्ठा, डोळ्यांदेखत होणारे नरसंहार आणि स्त्रिया वरिल बलात्कार सहन करूनही अतिशय खडतर लढाई लढून आजच्या अवस्थेत आपल्याला आणून ठेवले आहे. आदिवासी वरिष्ठ आणि वाडवडिलांनी जगाच्या सर्व राष्ट्रांची सर्वोच्च संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाकडून आदिवासी - मुलवासींची व्याख्या आणि अधिकार कागदावर उतरवून घेतले आहेत. ही साधी सोपी गोष्ट नव्हती. असे असले तरी आपली लढाई संपलेली नाही, लढाईचा चौथी फेरी लढण्यासाठी आपले पुर्वज जिवंत नाहीत. संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेत कागदावरच अडकलेली Indigenous - मुलवासी व्याख्या आणि UNDRIP चे अधिकार प्रत्यक्ष जमीनीवर उतरवण्यासाठी देशाच्या सरकारबरोबर एक मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. 9 आॅगस्ट हा दिवस याचसाठी दिला आहे ज्या दिवशी आपल्या वाडवडिलांनी केलेल्या संघर्षाचे, बलिदानाचे स्मरण करून त्यांची लढाई यापुढेही आम्ही लढणार आहोत म्हणून निश्चिय करून शपथ घेण्याचा हा दिवस आहे. म्हणून या जागतिक आदिवासी दिवसाची आपण प्रत्येक गाव - पाड्यावर वर सांगितल्याप्रमाणे आदिवासी समुदायांना या इतिहासाची जाणीव करून दयावी, लोकांना लढण्याची प्रेरणा देणे हे आपले काम आहे. तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात प्रशासकीय मुख्यालयावर एकाचवेळी धरणे आंदोलन करून भारतीय आदिवासींना Indigenous Peoples म्हणून दर्जा देऊन लवकरात लवकर UNDRIP चे अधिकार लागू करण्यासाठी आंदोलन उभे करावे. ही लढाई आपली प्रत्येकाची आहे. उद्या पुढच्या पिढीने, आपल्या मुलांनी 'प्रश्न विचारला की, बाबा /आई आपल्या पुर्वजांनी लढून संयुक्त राष्ट्र संघाकडून कागदावर आदिवासी - Indigenous Peoples आणि त्यांचे अधिकार UNDRIP लेखी करुन घेतले, ते प्रत्यक्षात लागू करण्यासाठी तुम्ही काहीही प्रयत्न का केले नाही...? आम्हाला अधिकार का नाही...?" असा प्रश्न विचारल्यास आमच्यावर खजिल होऊन मान खाली घालायची वेळ येऊ नये. जिंकलो किंवा हरलो पण पुढच्या पिढीला सांगता आले पाहिजे की, "बाळा आम्ही लढलो होतो, आणि आत्ता पुढची लढाई तुला लढायची आहे." विचारवंतांनी म्हटल्याप्रमाणे 'तुम्ही लढत राहा, तुमच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचार, अपमानाचा बदला तुमची पुढची पिढी घेईल, त्यासाठी त्यांना तुमचा अभिमान वाटेल लढ्याची प्रेरणा मिळेल अशी घनघोर लढत द्या.'
सर्वांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील लढाईसाठी जोहार आणि जिंदाबाद !! लडेंगे - जितेंगे !!
VIJE⚡AR - आएप
Comments
Post a Comment